Ad will apear here
Next
प्रकाशपुत्र
रघू... रघुनाथ... सद्गुरू श्री शंकर महाराजांनी निवडलेला, अध्यात्मात खूप उंची गाठण्याची क्षमता असलेला एक साधक, खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा. महाराजांनी त्याला सोपवलं आपलाच शिष्य जगन्नाथ याच्याकडे. रघुनाथ आणि जगन्नाथ यांच्या आध्यात्मिक प्रवासाची आणि अनोख्या नात्याची कहाणी जगन्नाथ कुंटे यांनी ‘प्रकाशपुत्र’ या पुस्तकातून मांडली आहे. त्याचा काही अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.
..........
मूर्ती किंवा चेहरे म्हणजे केवळ प्रतिमा. प्रतिमा म्हणजे परमेश्वर नव्हे. परमेश्वर म्हणजे प्रकाश, चैतन्य. आपल्याला भास होत असतो. आपण मायेच्या खेळात हरवून जातो. प्रतिमा म्हणजे मनाची फसवणूक आहे; हे विसरतो. मायेच्या मोहजालात अडकतो. खोटं आहे, ते सत्य वाटायला लागतं. खऱ्यापेक्षा प्रतिमेच्या प्रेमात पडतो. मनही भुलून जातं.

एकदा मी सद्गुरूंच्या समोर बसून त्यांना एकाग्र पाहत बसलो होतो. खूप वेळानं त्यांच्या जागी प्रकाश दिसू लागला. आधी सौम्य पिवळा प्रकाश. मग तेजस्वी प्रकाशाचा प्रखर झोत. मी त्या झोतात विलीन झालो. समाधी अवस्थेत गेलो. दोन तासांनी जागा झालो. डोळे उघडले. समोर मंद हास्य करीत सद्गुरू बसले होते. मी पाहतच बसलो. 

तेच म्हणाले, ‘देह काय नित्य नाहीये. देह पडेल. मागे काही शिल्लक राहणार नाही; पण चैतन्य कायम आहे. मिटलेल्या किंवा उघड्या डोळ्यांसमोर चैतन्य प्रकट होईल. श्रद्धा हवी. सबुरी हवी.’ गुरू येतातच. गुरूंचं चैतन्य नित्य असतं. असतंच! चित्रात देवाच्या डोक्यामागे तेजोवलय दाखवतात. सद्गुरूंच्या संपूर्ण देहाभोवती तेजोवलय असतं. त्याला चैतन्याचा ऑरा म्हणावा. श्री सद्गुरू शंकर महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, श्री साईबाबा किंवा नाशिकचे श्रीसद्गुरू शिवबाबांचं असंच दर्शन घडतं. देहभान हरपतं. डोळे मिटतात. सद्गुरू देहानं दर्शन देतात. हा खेळ नित्य चालू असतो.

विठ्ठल म्हणजे तेजाची मूर्ती - तो सावळा कृष्ण. काळ्यानं स्वतःला झाकून घेतलंय. कृष्णरंगात सगळे रंग असतात. बंगालमध्ये ठाकूर परमहंस आहेत. दक्षिणेत रमण महर्षी आहेत. सगळी चैतन्याची रूपं आहेत. या तेजाच्या वलयात आपल्या श्रद्धेचं रूप बघावं. निखळ आनंदाचं झाड होऊन जाल. सळसळता आनंदाचा अनुभव! उसळणाऱ्या लाटांचा चैतन्याचा समुद्र. सूर्याच्या हजारो प्रतिबिंबांचा अनुभव!

साधनेत काही वेळा चैतन्याचे कणकण दिसतात. ध्यान हळूहळू गाढ होऊ लागतं. भान हरवून जातं. चैतन्याचे कणन् कण एक होऊन जातात. त्या कणांचा भोवती पिंगा होतो आणि आपणच एक चैतन्याचा महासागर होऊन जातो. सागराच्या खोल खोल गहराईत हरवतो. अस्तित्व नाहीसं होतं. ‘स्व’चा म्हणजेच अहंकाराचा कोंभही खुडला जातो. ‘मी’ राहत नाही.
श्री शंकर महाराज म्हणतात, ‘मी मेला पाहिजे.’ त्या क्षणापुरता तो मरतो. आणि जागे झालो, की पुन्हा शरीरभर पसरतो. नित्य साधनेनं ‘मी’ हळूहळू मरतो. कठीण आहे - पण सोप्पंसुद्धा आहे. सद्गुरूंनी आपल्याला साधना दिली आहे. निर्धास्त राहा. निश्चिंत राहा. सद्गुरूंच्या चैतन्यात चैतन्य एक होऊन जाईल.

‘महाराज, मला शिकवा ना. मलाही साधना करायचीय. शिकवा ना. मी शरण आलोय तुम्हाला. म्हणाल ते करीन. कृपा कराच.’

मी खो खो हसायला लागलो. हा काही ऐकून घेईल. दोन घटकांची करमणूक फार हौस; पण कोणी चिकटायला लागला, की सूंबाल्या करून पळापळ करायची घाई. डोळे भिरभिरू लागले. पायांची घडी मोकळी झाली. हाताची हालचाल वाढू लागली. स्वस्थ असूनही शरीराची अस्वस्थता वाढू लागली. हा चिकटला तर गोंधळ होईल. पळावं, पुढचा मुक्काम गाठावा. 

युद्धात मार खायची वेळ आल्यावर साक्षात् कृष्णानं पलायन केलं. रणछोडदास म्हणून बदनाम झाला. मी साधारण माणूस. आंडूपांडू. कोणी नाव विचारलं तर सांगावं – ‘माझं नाव आंडू – पांडू.’ या गुरुबाजीच्या बंधनात अडकायचं नसेल, तर पलायन हा उत्तम मार्ग!

समान नसतंच काही; पण खांद्यावरची पिशवी असते. तेवढाच ओझ्याचा भार; ‘नदीवर आंघोळीला जातो’ म्हणून उठलो. कृष्णा नदीकाठचा प्रवास होता. झपझप मार्ग कापू लागलो. रस्त्यातले दगडधोंडे पायाला त्रास देत होते. वारा बेभान झाला होता. डोक्यावरचे केस अस्ताव्यस्त उडत होते. पुढे शेत लागलं. घुसलो शेतात. हळूहळू मी दिसेनासा झालो. शेतातल्या गव्हाचं पीक पाय, मांड्या घासून काढू लागलं. मागून त्याच्या हाका पाठलाग करीत होत्या, ‘महाराज, स्वामी ऽऽ, थांबा. थांबा. मी येतोय. स्वामीजीऽऽऽ.’ 

(‘प्रकाशपुत्र’ हे जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZUFCI
Similar Posts
चैतन्यस्पर्श ‘आपण सापाला घाबरतो, त्याच्या हजारपट जास्त तो आपल्याला भितो. आणि त्या भीतीपोटी तो जी डिफेन्स मेकॅनिझम वापरतो म्हणजे फणा उगारून फुत्कारतो त्याने आपण घाबरतो. आज मुक्काम कर, तुला उद्या बापूसाहेबांना भेटवतो...’ ‘कोण बापूसाहेब? योगी वगैरे आहेत का?’ ‘छे रे, बापूसाहेब म्हणजे एक भुजंग आहे.. जुना... नव्वद वर्षे वयाचा सर्प आहे
चैतन्यस्पर्श : सचिन मधुकर परांजपे (अभिवाचन व्हिडिओ) पालघर येथील ज्योतिष, वास्तुशास्त्र आदी विषयांचे मार्गदर्शक आणि अध्यात्मविषयक लेखक सचिन मधुकर परांजपे यांना आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रवासात ध्यानातून, प्रत्यक्ष भेटीतून जे अनुभव आले, ते त्यांनी वाचनीय स्वरूपात ‘चैतन्यस्पर्श’ या पुस्तकातून वाचकांसमोर मांडले आहेत. त्या पुस्तकातील एका उताऱ्याच्या, परांजपे
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज रचित श्री दत्तात्रेय स्तोत्राचे विवेचन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांनी रचलेले श्री दत्तात्रेय स्तोत्र अद्भुत आहे आणि त्यात प्रचंड अर्थ सामावलेला आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे सद्गगुरू श्री. वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी या स्तोत्रातील प्रत्येक शब्दाच्या अर्थासह व्यापक विवेचन करणारे पुस्तक लिहिले आहे
स्त्रियांचे पारंपरिक खेळ स्त्रिया आणि नवनिर्मितीचा संबंध प्राचीन आहे. वेगवेगळ्या प्रसंगांची गीतं, खेळ, उखाणे यातून स्त्रियांची प्रतिभा फुलत आली आहे. सतत नावीन्याचा ध्यास असणाऱ्या स्त्रीने काळानुसार त्यात भर घातली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language